मराठवाडा, विदर्भात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. अनेक सुरुवातीपासून पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. मात्र आता ही पाणी टंचाई पुणे जिल्ह्यात देखील दाखल झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. पुणे जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील १७८ गावे आणि ३१६ वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.
पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक ४० गावांना दुष्काळाने ग्रासले आहे. तालुक्यातील शेकडो वाड्या वस्त्यांचा देखील दुष्काळात समावेश आहे. तालुक्यातील एक लाख सहा हजार ८८१ लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. याच भागात ७४ हजार ३३६ जनावरे असून ती देखील टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
दुष्काळात दुसऱ्या क्रमांकावर आंबेगाव तालुका आहे. तालुक्यात २९ गावे आणि १५८ वाड्या वस्त्यांना २३ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुकानिहाय पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ठराविक खासगी विहिरी आणि विंधन विहिरी (बोअरवेल) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पुरंदर तालुक्यात ८७ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ बारामती २८, हवेली २६, आंबेगाव २३, जुन्नर २० तर इंदापूर तालुक्यातील दुष्काळी भागात १९ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. खेड तालुक्यात १४, शिरूर १२, दौंड १०, भोर ९, वेल्हे तालुक्यात ४ टँकर सुरु आहेत.
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यातील एकाही गावाचा अथवा वाडी वस्तीचा दुष्काळाच्या यादीत समावेश नाही. त्यामुळे या दोन तालुक्यांमध्ये एकही सरकारी टँकरचा पाणीपुरवठा होत नाही.