पुणे : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याला मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील एका लहान लॉजमधून पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला आज (बुधवार) पोलीस बंदोबस्तात सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयासमोर गोंधळ झाल्याचे पहायला मिळालं. विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती शाई फेकण्यात आली. वंदे मातरम् संघटनेने हे पाऊल उचललं. याप्रकरणी वंदे मातरम् संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पुण्यातील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला न्यायालयाकडे आणले जात होते. त्यावेळी त्याच्यावर शाई फेकण्यात आली. वंदे मातरम् संघटनेने हे काम केलं आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाबाहेर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी संघटनेच्या कार्य़कर्त्यांना रोखत त्यांना ताब्यात घेतल. यावेळी आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. या प्रकरणात अल्पवयीन जेवढा जबाबदार आहे, त्याचे वडील देखील तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या घटनेतील आरोपी ज्या बारमध्ये दारु पिण्यासाठी बसला होता, त्याच्यासोबत अनेक जण दारु पिण्यासाठी बसले होते. ते सर्व या प्रकरणात आरोपी करा, अशी मागणी वंदे मातरम संघटनेने केली आहे. याप्रकरणी आरोपीचे तोंड काळे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही शोभणारी गोष्ट नाही. त्यामुळेच आम्हाला त्याच्या तोंडावर काळे फासयाचे होते. आम्ही काही प्रमाणात त्याच्यावर शाई फेकण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळे आम्ही जे करण्यासाठी आलो होतो ते आम्ही केले आहे. मात्र, या प्रकरणी त्या शोरुम मालकाविरोधातही गुन्हा दाखल करा. जोपर्यंत प्रकरणी त्या दोन निष्पाप मुलांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. यापुढे यापेक्षा उग्र आंदोलन करु असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.