पुणे : पैशांच्या देवाण-घेवाणीतून विवाहितेसोबत ओळख होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर प्रियकराने महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. मानसिक तणावात असलेल्या विवाहितेने शनिवारी (दि. १) मुंबई बेंगलोर महामार्गावरील जांभुळवाडी येतील दरीपुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
रहिम शेख (रा. कागदीपुरा, कसबा पेठ, पुणे) याच्यावर भा.दं.वि. कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करुन त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मयत महिलेच्या ४७ वर्षीय पतीने सोमवारी (दि.२) रोजी फिर्य़ाद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीची पैशाच्या देवाण घेवाणीतून आरोपी सोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. आरोपीने फिर्यादी यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तिला शारिरीक व मानसिक त्रास डेटसल्याबाबत महिलेने तिच्या नवऱ्याला वारंवार सांगितले. आरोपीच्या त्रासामुळे फिर्यादी यांची पत्नी मानसिक तणावात होती. रहिम याच्यासोबत प्रेमसंबंध करुन चुक केल्याची कबुली महिलेने आपल्या पतीकडे देऊन तो वारंवार पैशांची मागणी करत असल्याचे देखील सांगितले होते. तसेच सोबत राहण्यास आली नाहीतर कुटुंबातील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले.
त्याच्याकडून होत असलेल्या त्रासामुळे जीवाचे बरेवाईट करुन घेणार असल्याचे महिलेने फिर्यादी यांना सांगितले होते. शनिवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या पत्नीने दरीपुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला रहिम शेख हा जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.