पुणे: पुणे बाजार समितीमध्ये आंबा हंगाम सुरु झाला आहे. परंतु, आंबा आवकमध्ये सध्या गोलमाल सुरु झाला असून व्यापारी आणि समितीच्या आवकमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर येत आहे. संचालक मंडळाकडून मर्जीतल्या आडत्यांची आंबा आवकमध्ये मोठ्या प्रमाणात लपवाछपवी सुरू झाल्याची चर्चा बाजारात आहे. तर आवक आणि सेस मध्ये लपवाछपवी करण्यासाठी वरिष्ठांना डावलून कनिष्ठ अधिकाऱ्यांची विभाग प्रमुख पदावर नियुक्ती केल्याची देखील चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. त्यामुळे यंदाचा आंब्याचा हंगाम चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड मधील फळ बाजारात सध्या आंब्याची आवक सुरु झाली आहे. कोकणातून हापुस आणि कर्नाटकासह इतर राज्यातून आंब्याची आवक होत आहे. सध्या मार्केट यार्डमध्ये दररोज ८ ते १० हजार पेट्यांची आवक होत असून पाडव्यापासून यामध्ये मोठी वाढ होणार आहे. बाजार समितीच्या वतीने सांगण्यात येणारी बाजारीतील प्रत्यक्ष आवक आणि व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येणारी आवक यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे.
बाजार समितीमध्ये शेतमाल आवक लपवा छपवीचा प्रकार नवीन नाही. प्रत्येकवर्षी असा प्रकार सुरु असतो. परंतु, आता संचालक मंडळाकडून मर्जीतल्या आडत्यांची आंबा आवकमध्ये मोठ्या प्रमाणात लपवा छपवी सुरु झाल्याची चर्चा मार्केट यार्डमध्ये सुरु आहे. यासाठी मर्जीतील कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुख पदावर नियुक्ती करुन घेतली आहे.
गट प्रमुखांचा पार्कींगमध्ये अड्डा
फळे व भाजीपाला विभागात १५ फुटांपेक्षा जास्त जागेचा वापर करुन रस्त्यावर व्यवसाय सुरु आहे. काही व्यापारी रस्त्यावर गाड्या लावून व्यापार करत आहेत. काही व्यापारी १० ते १२ मनमानीच्या गाळ्यावर दुबार विक्री करत आहेत. परंतु, याकडे कानाडोळा करुन पाच ते दहा हजारांची कारवाई करुन अनेकांना मुभा दिली जाते. फळ बाजार विभागात गट प्रमुख, कर्मचाऱ्यांनी गेटवर सिक्युरीटीच्या केबिन, पार्किंमध्ये अड्डा बनवला आहे.
आंब्याची आवक पारदर्शीपणे नोंदवणार
यासंदर्भात बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले की, बाजारात दाखल होणाऱ्या सर्व आंब्यांची आवक नोंद होण्यासाठी बाजार पर्यवेक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. याशिवाय त्यांच्या सोबत इतर दोन कर्माचारी असे तीन अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. फळे व भाजीपाला विभाग प्रमुख यांच्यावर ही नेमणूक असेल. आंब्याची आवक पारदर्शीपणे नोंदवण्यात येईल.