विश्रांतवाडी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करुन अश्लील वर्तन करणाऱ्या रोडरोमियोला सुजाण नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा प्रकार सोमवारी (दि.३) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास टिंगरेनगर येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीची छेड काढून तसेच त्यांच्यासोबत असभ्य वर्तन करण्याच्या घटना पुणे शहरात दिवसों दिवस आहेत.
दि.३ रोजी घडलेल्या घटने बाबत १९ वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून गौरवसिंग राजेंद्रसिंग लोहेट (वय-२० रा. बि यु भंडारी, आकांशा सोसायटी, टिंगरेनगर, पुणे) याच्यावर पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५४, ३५४(ड) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास टिंगरेनगर येथील सार्वजनिक रोडवरून पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी त्याच्या दुचाकीवरुन आला, त्याने फिर्यादी यांना पाहुन त्याची दुचाकी वळवून पाठलाग करण्यास सुरवात केली. काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना अश्लील स्पर्श करुन अंगावरील ड्रेस ओढून त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी यांनी लोकांच्या मदतीने आरोपी गौरवसिंग याला दुचाकीसह पकडून विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक त्याला केली आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.