पुणे : माहेरी आलेल्या विवाहित तरुणीला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मांजरी परिसरात घडली असून हडपसर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. याबाबत २२ वर्षीय विवाहित महिलेने रविवारी (दि.१४) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरुन वैभव विष्णू गायकवाड (रा. मांजरी बु., पुणे) याच्यावर भा.दं.वि. कलम ३७६, ३७६/२/एन, ५०६ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला एकाच परिसरात राहतात. ऑगस्ट २०२३ मध्ये महिला त्यांच्या आई-वडिलांच्या घरी माहेरी आली होती.
त्यावेळी आरोपीने फिर्यादी घरामध्ये एकटे असताना घरात आला. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने महिलेला धाक दाखवला. तसेच आई-वडिलांना जीवे मारुन टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.