पुणे : विवाह इच्छुकांची माहिती संकेतस्थळावर देऊन विवाह जुळविण्यास मदत केली जाते. अशा संकेत स्थळावरून ओळख झालेल्या एकाने संगणक अभियंता असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिला तब्बल ४० लाख ५० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर फसवणूक व आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी तरुणी खराडी भागातील एका आयटी कंपनीमध्ये अभियंता आहे. तिने एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. संकेतस्थळावर तिचा राजेश शर्मा याच्याशी परिचय झाला. शर्माने तिच्यासोबत लग्न करण्यास होकार दिल्यानंतर दोघांमधील संपर्क वाढला. लवकरच भारतात येऊन स्थायीक होणार असून व्यवसाय सुरु करणार असल्याचे शर्माने तरुणीला सांगितले. तसेच बनावट विमान तिकीट तिला पाठवले. त्यामुळे तरुणीचा शर्मावर विश्वास बसला.
त्यानंतर शर्माने तरुणीला विमानाने दिल्लीत येणार असल्याचे सांगितले.
दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) चौकशी सुरु केल्याचे तरुणीला सांगितले. परदेशी चलनाबाबत चौकशी करण्यात असल्याचे सांगितले.
तातडीने काही पैसे जमा करावे लागतील असे सांगून तरुणीला बँक खात्यात लगेच पैसे जमा करण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणीने ४० लाख ५० हजार रुपये बँक खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर शर्माने त्याचा मोबाईल बंद केला. तरुणीने शर्माला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.