पुणे शहरातील येरवडा येथे असलेल्या पर्णकुटी टेकडीवर असलेल्या तारकेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.४) मध्यारात्री दीड ते पहाटे पावणे सहाच्या दरम्यान घडला असून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सादर चोरीबाबतची तक्रार सुधीर वसंतराव वांबुरे (वय-६७ रा. येरवडा गाव, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्णकुटी टेकडीवरील तारकेश्वर मंदिराचे मुख्य लोखंडी दरवाजाचे स्लायडिंगचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मंदिरातील स्टीलच्या सहा दानपेट्या चोरट्यांनी फोडून भाविकांनी दान केलेली रोख रक्कम चोरुन नेली.
चोरट्यांनी दान पेटीतून एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार मंगळवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास फिर्य़ादी मंदीरात आले असता उघडकीस आला. त्यांनी याबाबत येरवडा पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.