पुणे : रूममेट मुलींकडून दिव्यांग मुलीची रॅगिंग, त्रास सहन न झाल्याने ‘ब्रेन स्ट्रोक’; लोणावळ्यातील धक्कादायक घटना
पुण्यात हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या एका विद्यार्थिनीने रुममेट्सच्या त्रासाला कंटाळून आणि विद्यापीठाचा कॅन्टीनमधील मुलाच्या एकतर्फी प्रेम प्रकाराला घाबरून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर आता लोणावळ्यातील एका नामांकित महाविद्यालयात एमबीए. सीए च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय दिव्यांग मुलीवर वसतिगृहात तिच्या रुममध्ये राहणाऱ्या मुलींनी रॅगिंग केली. यामुळे मुलगी तणावात गेल्याने तिला मागील आठवड्यात ब्रेन स्ट्रोक आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. सध्या तिच्यावर पिंपरी चिंचवड शहरातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याबाबत मुलीच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे तक्रार केली आहे.
१९ वर्षीय पीडित इतर तीन मुलींसह लोणावळ्यात वसतिगृहात राहते. तिन्ही मुली पीडितेला खूप त्रास द्यायच्या. बाथरूम मध्ये कोंडले जायचं. तिच्या पाठीमागे चाकू घेऊन धावायचं. काही वेळा तर पीडितेला चाकू लागल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तिच्या दिव्यांगावरुन चिडवणे, टोमणे मारणे, अशी कृत्य तिन्ही मुली करत होत्या. हा प्रकार मागील दोन ते ती न महिन्यांपासून सुरु होता.
पीडित तरुणीने याबाबत वडिलांना दिली. त्यांनी त्या तीन मुलींपैकी एका मुलीच्या वडिलांना फोन करुन तुमची मुलगी माझ्या मुलीची रॅगिंग करते असे सांगितले. त्यावेळी मी फौजी आहे, असे म्हणत त्यांनी उलट पीडितेच्या वडिलांना धमकावले. मुलीने मुख्याध्यापीका यांच्याकडे तीन मुलींची तक्रार केली. मात्र, उलट त्या मुलींचं करिअर खराब होईल असं सांगून तिला तक्रार करु नकोस असे सांगितले.
कुचंबणा होत असल्याने पीडित तरुणी तणावात गेली. मुली खूपच मानसिक त्रास देत असल्याने १२ मार्च रोजी मुलीला रात्री अकराच्या सुमारास ब्रेन स्ट्रोक आला, असा आरोपी पीडितेच्या वडिलांनी केला आहे. संबंधित मुलींवर रॅगिंग केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस तक्रार करुन देखील न्याय देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.