पुणे: व्हाट्सअँप स्टेटसला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लारेन्स बिष्णोई याचे फोटो ठेवून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य ठेवणार्या तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लोणी काळभोरमधील एका ४० वर्षाच्या नागरिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमीर इनामदार (रा. इनामदार वस्ती, लोणी काळभोर), अरबाज मणियार (रा. पाषाणकरबाग, लोणी काळभोर), जुबेर तांबोळी (रा. प्राचीन शिवालयाजवळ, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना मोबाईलवर व्हाट्सअँप स्टेटस पाहत असताना आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर दाऊद इब्राहिम व लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटो स्टेटसला लावले होते. त्या फोटोवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर लिहिला होता. या मजकूरामुळे धार्मिक, अगर जातीमध्ये एकोपा टिकण्यास बाधक व सार्वजनिक शांतता बिघडवण्यास संभवनीय अशी कृती केली असल्याबाबत फिर्यादीत म्हंटलं आहे. यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपस सुरु आहे.