पुणे : रस्त्याच्या मध्ये उभी केलेली थार (एमएच १२ व्हीव्ही ५०) गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन तरुणीसोबत वाद घातला. वाद मिटवण्यासाठी तरुणीची आई आली असता तिला मारहाण केली. तसेच तरुणीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला. हा प्रकार कोंढवा बुद्रुक येथील सार्वजनिक रोडवर मंगळवारी (दि.२०) रात्री नऊच्या सुमारास घडला आहे.
याबाबत पीडित तरुणीच्या ५४ वर्षीय आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन एका अनोळखी व्यक्तीसह दोन महिलांवर आयपीसी ३५४(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याची थार कार रस्त्यामध्ये पार्क केली होती. त्यामुळे फिर्य़ादी यांच्या मुलीने आरोपीला कार बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, त्याने कार बाजूला घेण्यास नकार दिला.
त्यावेळी एक महिलेने फिर्य़ादी यांच्या मुलीचा गळा पकडला असता तिने महिलेला ढकलून दिले. याचा राग आल्याने कारमधील व्यक्तीने मुलीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादी यांनी मध्यस्थी केली असता दोन महिलांनी त्यांना माराहण करण्यास सुरुवात केली. आईला सोडवण्यासाठी तरुणी मध्यस्थी केली. त्यावेळी कार मधील व्यक्तीने तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केला. तसेच महिलांनी ‘हा एरिया आमचाच आहे, तुम्हाला सोडणार नाही’ अशी धमकी देऊन फिर्यादी यांना ढकलून दिले. यामध्ये फिर्य़ादी यांना गंभीर दुखापत झाल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.