पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. चाचणीसाठी पाठविलेले रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीचे नसल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं. त्यानंतर, रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी बदलल्याचा आरोप झाला. आता हे बदललेले रक्ताचे नमुने कोणाचे आहेत, याविषयी डॉ. पल्लवी सापळे यांनी बनवलेल्या अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीऐवजी ससून रुग्णालयात त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतलं असल्याची माहिती आता अधिकृतरित्या समोर आली आहे.
कल्याणी नगर अपघात प्रकरणात डॉ. पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीऐवजी ससून रुग्णालयात त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतलं असल्याची माहिती आता समोर आली आहे. ससून हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीहरी हारनोळ यांनी एकूण तीन जणांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
अल्पवयीन आरोपीची आई आणि बिल्डर विशाल अगरवालची पत्नी शिवानी अगरवाल हिच्यासह दोन वृद्धांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची माहिती समोर आली आहे. ब्लड सॅम्पल फेरफार करुन अल्पवयीन आरोपीच्या नावाखाली चाचणीसाठी पाठवल्याचा आरोप होत आहे. आरोपीच्या आईवरतीही कारवाईची शक्यता असून आईची चौकशी झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
मागील काही काही दिवसांपासून ब्लड सॅम्पल बदलल्याच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यानंतर हे ब्लड नेमंक कोणाचं होतं, यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. हे रक्त कोणाचे होते हे समोर आले नव्हते. मात्र, डॉ. पल्लवी सापळे यांच्या समितीने ससूनमधील चौकशीचा अहवाल बनवला आहे, यातून अनेक महत्त्वाच्या बाबीर समोर आल्या आहेत.
अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याच्या उद्देशाने ससूनचे डॉ. श्रीहरी हरनोळ यांनी एकूण तीन जणांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये एका महिलेचे रक्त होते तर दुसरे दोन वृद्ध व्यक्तीचे आहे, असं या अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे हे महिलेचे रक्त अल्पवयीन आरोपीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. याच महिलेचे रक्त पुढे तपासणीसाठी देण्यात आलं होतं. त्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या वडीलांच्या रक्तासोबत मॅच झालं नाही. त्याचा डीएनए जुळला नाही. त्यानंतर आरोपीचे रक्त घेण्यात आले आणि ते त्याच्या वडीलांसोबत मॅच झालं. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे. यानंतर तिघांना अटक केली आहे.