पुणे: जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत (ता. २७) ५६.३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचं हे प्रमाण एकूण साठ्याच्या तुलनेत केवळ २८.३९ टक्के इतके अल्प आहे. हा उपलब्ध साठा गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत ३८.८८५ टीएमसीने कमी आहे.
पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण कोरडे पडले असून उजनीतील उपयुक्त साठा शून्याच्या खाली गेला आहे. आतापर्यंत उजनीतील अचल (मृतसाठा) साठ्यातील १९.११ टीएमसी पाणी वापरले आहे.गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ९५.१९ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे ४७.९९ टक्के इतके होते. त्यामुळे यंदाचा आजअखेरचा उपलब्ध पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत १९.६० टक्क्यांनी कमी झाला आहे. या २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या सहा धरणांमधील साठा वेगळा आहे. जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे टाटा समूहाची व उर्वरित २६ धरणे आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता १९८.३४ टीएमसी इतकी आहे.
टाटां’च्या धरणांत २१.९० टीएमसी पाणी
टाटा उद्योग समूहाच्या धरणांमध्ये मुळशी, ठोकळवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या सहा धरणांची एकूण साठवण क्षमता ४२.७६ टीएमसी आहे. यापैकी सध्या २१.९० टीएमसी (५१.२१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.प्रमुख धरणांमधील बुधवारचा साठा (टीएमसीमध्ये)
- – टेमघर — ०.३३
- – वरसगाव — ६.६४
- – पानशेत — ४.९६
- – खडकवासला — १.०८
- – पवना — ३.९९
- – चासकमान — २.६८
- – भामा आसखेड — ३.६५
- – आंद्रा — १.६४
- – गुंजवणी — १.६६
- – भाटघर — ८.०३
- – नीरा देवघर —४.२७
- – वीर — ४.२५
- – माणिकडोह — १.०९
- – येडगाव — ०.८९
- – डिंभे — ५.२४
‘टाटां’च्या धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
- – मुळशी — ९.१९
- – ठोकळवाडी — ६.९७
- – शिरोटा — ४.२५
- – वळवण — १.३४
- – लोणावळा — शून्य
- – कुंडली — ०.१५