पुण्यातील कल्याणीनगर भागात १७ वर्षे आठ महिने वय असलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार चालवून अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या प्रकरणानंतर पुणे शहरात पोलीस, महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून अनधिकृत पब, बार वर कारवाई करण्यात आली. अपघात झाल्यानंतर ज्या वेगाने कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली होती तो कारवाईचा वेग मात्र गेल्या दोन दिवसांपासून कमालीचा थंडावला आहे.
अपघात घडल्यानंतर २२ मे रोजी पुण्यात तब्बल ४० ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. मात्र आता तोच आकडा २९ मे पर्यंत फक्त दोनपर्यंत येऊन पोहोचला आहे. कारवाई सुरू केल्यापासून २२ मे ते २९ मे या कालावधीमध्ये ७७ प्रकरणांमध्ये कारवाई झाली.
पुण्याच्या या अपघात प्रकरणानंतर पुण्यातील पोलीस, ससून रुग्णालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरटीओ, महापालिका, पोलीस स्टेशनला मध्यरात्रीच पोहोचलेले आमदार , त्याचबरोबर जामीन देणारे बाल हक्क मंडळ या सर्वच यंत्रणा किती खोलवर पोखरल्या गेल्या आहेत याचाही पुरावा या प्रकरणानंतर समोर येत आहे.
मात्र, हा कारवाईचा धडाका पहिल्या दिवसाच्या तुलनेत सातव्या दिवसांपर्यंत पूर्णतः खाली आला. त्यामुळे यांना कोणाचा वरदहस्त आहे आणि कारवाई अचानक का थंडावली अशी चर्चा पुणेकर नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.