पुणे: गेल्या काही निवडणुकीतील अनुभव पाहता वंचितचा पहिल्या पहिल्यांदा जोर असतो. पण मतदानावेळी तो कमी होतो. त्यामुळे पुण्याची निवडणुक ही मोहोळ विरूद्ध धंगेकर अशी दुरंगीच होईल, असे प्रतिपादन शिंदे शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीबाबत डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, अजित पवार यांचे पूर्ण जिल्ह्यातील काम पाहता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय होईल. मी बारामती लोकसभा मतदारसंघात मेळावे घेतले आहेत, जिथे जिथे माझी गरज असेल, तिथे तिथे मी प्रचाराला जाईन.
तर, शिंदेंच्या शिवसेनेतून अजित पवारांच्या गटात गेलेले आढळराव पाटील यांच्याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्या पक्षाची हानी ही होतच असते. शिवाजीराव आढळराव हे शिवसेना सोडून गेले त्यामुळे शिवसेनेची हानी होईल. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोकसभा जागावाटपात महायुतीत प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील असे नसते. युतीमध्ये यापूर्वीही तडजोडी झाल्या आहेत. महायुतीमधील पक्ष प्रमुख याबाबत अंतिम निर्णय घेतील. सध्या आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, भाजपने आमचे उमेदवार बदलले असे पर्सेप्शन तयार केले आहे, पण असा गैरसमज पसरवणे योग्य नाही. यापूर्वीही पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिली गेली आहे. आमच्याकडे अजून कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे आरोप केले नाहीत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल.