पुणे : पुढील दोन दिवस पुण्यात पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांना प्रखर उन आणि उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो. दोन दिवसांपासून पुण्यात दमट वातावरण असून तापमान ३९ अंशाच्या जवळपास आहे.
पुण्यात अजूनही तापमान ३९ अंशाच्या पुढे गेलेले नाही आहे. मात्र मे महिन्यात तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तापमान ४३ अंशापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे मे महिन्यात पुणेकरांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागू शकतो.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून आद्र्रतायुक्त वारे गुजरातमार्गे महाराष्ट्र आणि पुण्याकडे वाहत आहेत, त्यामुळे शहरात सध्या दमट वातावरण जाणवत आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले तरी डिहायड्रेडशन होण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. कमाल तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअस असते तेव्हा उष्णतेची लाट म्हटले जाते. पुण्यात सध्या तरी तशी लाट नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्याच पावसाची शक्यता आहे. राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळचा समावेश आहे.