कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांच्या कारवाईला मोठा वेग आलेला आहे. आतापर्यंत एकूण दहा जणांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अपघात प्रकरणात विविध १५० सीसीटीव्ही यांची तपासणी सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे महापालिका यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. जे पब, बार अनधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणामुळे राज्यातीलच पब , बार चा मुद्दा चर्चेत आला आहे. पुण्यात महापालिका, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनधिकृत पब, बार वर कारवाई केली जात असतानाच आता मुंबईतील पब आणि बारवरदेखील मोठी कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती घडू नये या हेतूने पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
मुंबई महापालिका, राज्य उत्पादन शुल्क आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या शहरातील बार आणि पबची झाडाझडती सुरू केली आहे. मागील तीन दिवसात पोलिसांनी मुंबईत ५० ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मुंबईतील पवई परिसरात एका बार आणि पबवर पोलिसांनी छापेमारी केली असता चौकशीत एका अल्पवयीन मुलाला मद्य दिल्या प्रकरणी बारच्या मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल केला आहे.
टेक बहादूर आयर आणि वेटर विकास राणा अशी या दोन आरोपींची नावे आहेत.
पवई पोलिसांनी दोघांवर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५ च्या कलम ७७ अंतर्गत गुन्हा नोंदवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.