तळेगाव दाभाडे : नेहमीच वादग्रस्त असलेल्या तळेगाव दाभाडे येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन अल्पवयीन मुलाने एका तरुणावर गोळीबार केला. यामध्ये गोळी तरुणाच्या खांद्यातून आरपार गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी येथे मंगळवारी (दि.२३) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आदित्य गणेश भेगडे (वय-२७ रा. भेगडे आळी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि जखमी आदित्य भेगडे हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य भेगडे याचे एका अल्पवयीन मुलासोबत सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. तसेच अल्पयीन मुलाचा विरोधक असलेल्या एका तरुणाच्या वडिलांसोबत आदित्य फरत होता.तसेच त्याच्या घरी येणे-जाणं होतं. त्यामुळे आदित्यचा राग अल्पवयीन मुलाच्या मनात होता. त्यातून त्यांच्यामध्ये सोशल मीडियातून देखील एकमेकांना खुन्नस दिली जात होती.
मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आदित्य त्याच्या घरासमोर दुचाकीवर बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होता. त्यावेळी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या इतर दोन अल्पवयीन साथीदारांसोबत त्याठिकाणी आला. त्याने आदित्य जवळ येऊन सोबत आणलेल्या पिस्तुलातून आदित्य याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी आदित्य याच्या खांद्याच्या आरपार गेली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले.
खांद्याला गोळी लागून जखमी झालेला आदित्य जखमी अवस्थेत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आला. त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.