पुणे : कल्याणीनगर येथील मद्यपान करून पोर्शे कार चालवल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेचा राज्य तसेच देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांनी या अपघाताच्या घटनेवरून पोलिसांना धारेवर धरले आहे. आमदार धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांवर आरोप केले आहेत. ” या घटनेच्या तपासात पोलिसांकडून अनेक चुका झाल्या ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले. सर्व व्यवस्थेची बदनामी झाली. तपास अधिकाऱ्यापासून ते कमिशनर पर्यंत सर्व व्यवस्था विकली गेलेली आहे. या प्रकरणात डीलिंग कोणी केले ? कोणत्या हॉटेलात झाले? पोलीस आयुक्तांना कसे पाकीट गेले ?” याचा तपास करण्याची मागणी आमदार धंगेकर यांनी केली आहे.
अपघात झाल्यांनतर दोन तरुणांचा मृत्यू घडल्यानंतरही सदर अल्पवयीन मुलगा आणि त्याचे वडील घरी आराम करीत होते ही कोणती नीतिमत्ता ? पैसे खाल्ल्याशिवाय हे घडूच शकत नाही. आपण रस्त्यावर येऊन याबाबत आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले होते.आता खरं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आहे. त्याची सुरुवात पोलीस कमिशनर यांच्या पासून करायला हवी.
या प्रकरणात इतक्या गंभीर चुका होऊनही कमिशनने कुणावरही कारवाई केलेली नाही,याचाच अर्थ असा होतो हा गुन्हा दडपण्याच्या “डिल” मध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत,त्यामुळे त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी,अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
याबाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता अजित पवार म्हणाले, ” धंगेकरांनी केलेले आरोप मी माध्यमांमध्ये वाचले. याविषयी मी पोलीस आयुक्तांशी चर्चाही केलेली आहे. मुळात अशाप्रकारचे आरोप त्यांनी केले असतील तर पुरावे देणे महत्वाचे आहे. असे बिनबुडाचे आरोप करून काहीही साध्य होणार नाही” असे अजित पवारांनी म्हंटले. तसेच अशाप्रकारे कोणी आरोप करायला लागले तर त्यांचे काम करणे मुश्किल होईल , उगाच ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ याचा उपयोग नसल्याचेही पवारांनी म्हंटले आहे.