राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाला चांगलेच टार्गेट केले आहे. अजित पवारांचे अत्यंत जवळचे नेते सुनील तटकरे यांच्यावर रोहित पवार यांनी घणाघती टीका केली आहे. आता त्यांनी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनाच लक्ष्य केले आहे. ते गोंदियामध्ये बोलत होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील तेजस्वीनी लॉन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी पटेलांवर टीकास्त्र सोडले.
रोहित पवार म्हणाले, भाजपासोबत गेल्यानंतर प्रफुल्ल पटेलांना अहंकार झाला आहे. कारण सीबीआयने त्यांची ८४० कोटींची केस बंद केली. त्यामुळे आता काहीही बोलले तरी चालेल असे त्यांना वाटत आहे. त्यांना तर आता मिर्ची देखील गोड लागत आहे. प्रफुल्ल पटेल जास्त अहंकार दाखवू नका, नाहीतर तुमचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.
पवार कुटुंबीयांशी माझे नाते तुटलेले नाही. रोहित पवार गोंदियात आले तर माझे दार त्यांच्यासाठी नेहमी उघडे आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते. यावर रोहित पवार म्हणाले, मी एखाद्या शेतकरी कष्टकऱ्याच्या घरी जाणे जास्त उचित समजतो. पवार साहेबांच्या विचारांच्या पक्के असलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी मी जाईन पण तुमच्या हवेलीत जाणार नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी पटेलांचे निमंत्रण धुडकावले.