पुणे : खेड तालुक्याच्या दुर्गम भागातील देवतोरणे हे एक गाव.या गावापासून दीड किलोमीटर अंतरावर एस.टी.थांबण्याचे ठिकाण आहे.देवतोरणे गावातून,तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच राजगुरुनगर येथे महाविद्यालयात जाण्यासाठी युवक व युवती या बसथांब्यावर रोजच उभे राहताना सारेच ग्रामस्थ रोजच पाहतात. तासानतास एस.टी.ची वाट पाहत, उन्हांत हे युवक-युवती उभे राहिलेले दिसून यायचे.अलीकडील काळात एस.टी.चे वेळपत्रक हे पूर्णपणे कोलमडून पडले आहे अशीच स्थिती. अनेक वेळा एस.टी.उशिरा यायची म्हणून हे युवा-युवती मात्र तासनतास उभे राहत याचे कारण म्हणजे या बसथांब्यापाशी या मुलीना वा मुलांना बसण्यास कोणतीच व्यवस्था नव्हती.बर खाली बसावे तर कॉलेजला जायचे,कपडे घाण होणार त्यापेक्षा उभेच राहणे या मुली व मुले पसंत करत होत्या.
सर्वांनाच वाटत होते की येथे बसण्यास काहीतरी हवे होते,पण व्यवस्था कोणी व कशी करायची याबाबत मात्र सर्वच अनभिज्ञ होते.गावातील युवतीमध्ये नेतृत्व विकसित व्हावे,युवतींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या युवतीच्या गटासोबत वर्क फॉर इक्वालिटी या संस्थेचे काम सुरु आहे.गावातील या युवती गटाच्या वतीने गावात व युवतींच्या गटात विविध उपक्रम साजरे केले जातात.चर्चा केल्या जातात.एकदा युवती गटात मुलींच्या चर्चेतून बसथांब्या वर बसण्यास काही तरी व्यवस्था हवी हा प्रश्न पुढे आला.मुलीनी चर्चा केली आणि हा प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला.
वर्क फॉर इक्वालिटी संस्थेने याकामी तुम्ही एकत्रितपणे हा प्रश्न सोडवू शकता हा विश्वास दिला.व त्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन केले.पण पुढाकार घ्यायचा होता तो या मुलींनीच.मुलीनी सुरुवातीला गावच्या सरपंच यांची भेट घेतली.त्यांना हा प्रश्न सांगितला. सरपंचाना या प्रश्नाची कल्पना होतीच आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न ही सुरु केले होते.नवीन बसस्थानक व्ह्वावे यासाठी त्यांनी तालुकास्तरावर प्रस्ताव पाठवून हे बसस्थानक व्हावे यासाठी प्रयत्न ही सुरु केले होते. पण आता या प्रस्तावास कधी मंजुरी मिळेल याची माहिती नक्की कोणीच सांगू शकणार नव्हते.बरे सरकारी काम असे कधीच तातडीने होत नाही. हा, ही मुलींचा अनुभव होताच.सरपंच यांनी आपण पाठ्पुरावा करू असे सांगितले.मुली वाट पाहत होत्या पण प्रश्न काही सुटत नव्हता,पुन्हा सरपंचाची भेट,पुन्हा वाट पाहणे असे काही महिने सुरूच होते.
अखेर मुलीनी व सरपंच आरती शिंदे आणि गावातील मंडळी यांनी एक विचार केला.ग्रामपंचायत शेजारी लोकांना बसण्यास बाकडे होते.हेच बाकडे जोपर्यंत नवीन बसस्थानक मंजूर होवून त्याचे काम सुरु होत नाही तोपर्यंत हे बाकडे आपण बसस्थानकापाशी ठेवू असा निर्णय घेतला.पण आता हे बाकडे ग्रामपंचायत येथून ट्रक्टर मध्ये ठेवणार कोण तेथे उतरवणार कोण,ट्रक्टर कोणाचा आणि त्याचा खर्च कोण करणार असे प्रश्न होतेच.निर्णय तर झाला होता पण बाकडे काही बसस्थानकापाशी आले नाही.पुन्हा मुलींचा पाठपुरावा सुरूच.
अखेर ट्रक्टर उपलब्ध झाला.मुली स्वत:च बाकडे उचलून ट्रक्टर मध्ये ठेवण्यास व उतरवून घेण्यास पुढे आल्या.मुलीना ही साथ सरपंच व ग्रामस्थ यांनी दिली.आणि शेवटी बाकडे बसस्थानकावर आले.तासनतास एस.टी.ची वाट पाहत उभे राहून दमणाऱ्या मुली आता जरा विसावा म्हणून बाकडावर बसू लागल्या.उभे राहताना कधी उजव्या किंवा डाव्या पायावर पूर्ण शरीराचा भार देवून एस.टी.ची वाट पाहणाऱ्या मुली आता बाकावर बसून एस.टी येत पर्यंत पुस्तक वाचतील.आपल्या परीक्षेला सामोरे जाताना नोट्सवर घाई गडबडीने नजर मारतील.प्रश्न अजूनही सुटला नसला तरी प्रश्न सोडवण्याची हिमंत मात्र मुलींमध्ये नक्की आली.