देहूरोड : बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून या गोष्टीचा राग मनात धरत तिघांनी मिळून एका तरुणाला खदानी मध्ये ढकलून देत त्यास ठार मारले. ही घटना शुक्रवारी (दि. २०) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास देहूरोड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ट्राय जीजस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी घडली.
अजय जोगिंदर लुक्कड (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल चंदू सकट (वय १८), प्रेम सचिन मोरे (वय १९), ओमकार उर्फ गणेश रवींद्र पवार तिघे राहणार देहूरोड यांना पोलिसांनी अटक केली आहे.
देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत देहूरोड येथे मुंबई – बंगलुरु रोडवर असलेल्या ट्राय जिजस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदान मध्ये शुक्रवारी सकाळी एका तरूणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अजय लुक्कड हा तरुण पोलिसांना मृतावस्थेत आढळून आला.
अजय याचा कुणीतरी खून केल्याची शक्यता आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवत देहूरोड पोलिसांनी तपासाला सुरुवात केला. काही वेळेतच पोलिसांनी तीन जणांना संशयावरून ताब्यात घेतले. अजय लुक्कड याचे आरोपी कुणाल सकट याच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते व त्याच कारणावरून कुणाल याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून अजय याला खदानी जवळ बोलावून घेतले व त्याला खदानीत ढकलून दिले. त्यामध्ये अजयचा मृत्यू झाला. अशी माहिती देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे यांनी दिली. देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.