बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघात मोठा घोळ झाला आहे. येथे दोन उमेदवारांना तुतारी हे एकच चिन्ह देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आयोगानेच तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे हेच चिन्ह आहे. येथील आणखी एका अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्याने मोठा गोंधळ झाला आहे. या प्रकाराविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थेट केंद्रिय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
एकच चिन्ह दोन उमेदवारांना देण्यात आल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. संपूर्ण देशातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्धी माध्यमांनी दखल घेतलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत अशाप्रकारची गडबड का झाली, याबाबत अनेक शंकाकुशंक व्यक्त केल्या जात आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना सोमवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह देण्यात आले. तर सुप्रिया सुळे यांचे चिन्ह देखील तुतारी वाजवणारा माणूस असल्याने निवडणुकीत मोठा गोंधळ होणार आहे.
यावर शरद पवार गटाने आक्षेप घेत थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आता यावर केंद्रीय निवडणूक आयोग कोणता निर्णय देते आणि वेळेत निर्णय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती मतदारसंघासाठी १२ ते १९ एप्रिल या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत ५१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्जांच्या २० एप्रिल रोजी झालेल्या छाननीमध्ये ५ अर्ज बाद होऊन ४६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांची संख्या निश्चित झाल्याने अपक्ष उमेदवारांना मतदानासाठी चिन्हांचे वाटप झाले.
त्यामध्ये शेख यांनी पहिल्या पसंतीमध्ये तुतारी चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्ह शेख यांना तुतारी चिन्ह दिले. या प्रकाराविरूद्ध शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला आक्षेपाचा मेल केला आहे.