बालेवाडी येथील आदित्य ब्रिझ पार्क सोसायटीचा नवा आदर्श; दररोज ३५० युनिट्स वीज ची निर्मिती
बालेवाडीतील सोसायट्यांनी “ग्रीन ईनिशिएटिव ” व “ग्रीन बालेवाडी” ( हरित बालेवाडी) साठी पुढाकार घ्यायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आदित्य ब्रिझ पार्क सोसायटीत ७५ किलो वॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पंकज तगलपल्लेवार यांचे हस्ते झाले.
यावेळी तगलपल्लेवार यांनी विविध सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहान केले. तर बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन कडून पर्यावरण संरक्षण आणि त्या अनुषंगाने जनजागरण मोहीमेची माहिती दिली .
बालेवाडी येथील दसरा चौका जवळ असणाऱ्या आदित्य ब्रीज पार्क सोसायटी ही ५ इमारती व २३ रो हाऊस असणारी सोसायटी आहे. येथे महिन्याचे वीज बिल हे १ लाख ७५ हजार रुपये येत होते. आता हे बिल अंदाजे २५००० रुपये येईल. याचे कारण आहे, सोसायटीने बसविलेला सौरऊर्जा प्रकल्प. त्यामुळे दरवर्षी १८ लाख रुपये वाचणार आहेत.
सोसायटीला हा सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी ४२ लाख रुपये खर्च आला. त्यातून ७५ किलो वॅट चा सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला आहे. याद्वारे दररोज ३५० युनिट वीज तयार होते आहे. आता येथील रहिवासी सार्वजनिक वापरासाठी या विजेचा वापर करत आहेत, त्यामुळे विजेची बचत होत आहे.
या सोसायटीत सात मजली ५ इमारती असून एकूण १४० सदनिका, व २३ रो हाऊस आहेत. येथे ५ लिफ्ट आहेत. क्लब हाऊस, जलतरण तलाव, व्यायाम शाळा,बाग, खेळाचे मैदान, कूपनलिका, आहेत. या सर्व बाबीं साठी ही सौरऊर्जा वापरली जाते.
सोसायटीत जल शुध्दीकरण प्रकल्प, जल पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), ओला कचरा व्यवस्थापन, अशा सर्व योजना राबविल्या जात आहेत. अशी माहिती सोसायटी अध्यक्ष योगेंद्र सिंग यांनी दिली. या वेळी
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आदित्य ब्रिझ चे सचिव मानस शर्मा यांनी प्रास्ताविक केले तर खजिनदार मनोज कुमार यांनी सर्वांचे आभार मानले.