पुणे : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेने लग्नास नकार देऊन संपर्क करणे बंद केल्याने तिचे खासगी व्हिडीओ व फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखीच्या लोकांना पाठवून बदनामी केली. याप्रकरणी एका युवकावर फरासखाना पोलिसांनी आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.३) सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला आहे.
याबाबत २३ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन बापू तूलशीराम आव्हाड (वय-३३ रा. चंदननगर, पुणे) याच्यावर आयपीसी ३५४, ५०६ सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या पतीपासून विभक्त राहत असून त्यांची कौटुंबिक न्यायालयात केस सुरु आहे. तर आरोपीची देखील अहमदनगर येथील कौटुंबिक न्यायालयात केस सुरु आहे.
पीडित महिला आणि आरोपी यांची कामाच्या ठिकाणी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. मात्र, महिलेचा घटस्फोट झाला नसल्याने तिने आरोपीकडे लग्नासाठी सहा महिन्यांची वेळ मागून घेतली. मात्र त्याने याला नकार देऊन लगेच लग्न करण्यासाठी तगादा लावला. तसेच लग्न केले नाहीतर मारुन टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान पीडित महिला तिच्या मुलांना भेटण्यासाठी रत्नागिरी येथे जाणार होती. याबाबत तिने आरोपीला सांगितले असता त्याने मुलांना भेटू देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने महिलेने त्याच्यासोबत संपर्क करणे बंद केले. त्यानंतर आरोपीने वारंवार फोन व मेसेज करुन त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपीने त्याच्या मित्राच्या मोबाईल नंबरवरुन महिलेचा मित्र व तिच्या पतीला खासगीत काढलेले फोटो व व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवले. तसेच ओळखीच्या लोकांना व्हिडीओ व फोटो पाठवून बदनामी करुन विनयभंग केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.