आळंदी: एक दिवस आदी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
विठ्ठल दौलत गुट्टे (वय २४, रा. निळे गल्ली, मरकळ रोड, आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या आधारे आळंदी पोलिसांनी नागेश बालाजी कांबळे (वय १९, रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, ता. खेड), अदित्य तुकाराम सातपुते (वय २२, रा. कुर्हाडे वस्ती, वडगाव रोड, आळंदी) आणि विश्वजजित दामोदर कदम (वय २०, रा. आळंदी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर महेश पितळे व त्याच्या इतर ५ साथीदार फरार आहेत. या सर्व आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आका आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ७ वाजता आळंदी येथील मोकळया मैदानात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पितळे व त्यांच्या सोबतच्या ५ ते ६ मुलांनी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन महेश पितळे याने तुला आता जिवंत ठेवत नाही़ असे म्हणून फिर्यादी यांच्या डोक्यात कोयत्याने वर करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र फिर्यादी यांनी दोन्ही हात मध्ये घातल्याने कोयत्याचा वार त्यांच्या दोन्ही हातावर झाला. महेश पितळे याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने त्यांच्याकडील कोयत्याने वार केला. तो वार चुकवत असताना फिर्यादी यांच्या उजव्या गालावर वार झाला. इतरांनी फिर्यादीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी आलेले फिर्यादीचे मेव्हणे बालाजी लिंबोळे यांच्या पाठीत महेश याने कोयत्याने वार केला. पोलिसांनी टोळक्यामधील तिघांची नावे निष्पन्न करुन त्यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.