महाराष्ट्र: विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. मात्र सध्या मुख्यमंत्री पदावरून सत्ता स्थापनेला वेळ लागत असल्याची चर्चा आहे. निकालानंतर दिल्लीत झालेल्या एका बैठकीत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे संकेत देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी गेल्याने ते नाराज असल्याचे बोलले जातेय.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा मुकुट कुण्याच्या डोक्यावर असणार? याचे उत्तर अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी दुपारी १:०० वाजता होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भाजपचा गटनेता २ डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी १:०० वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यावेळीच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये, भाजपच्या आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर काय-काय काळजी घ्यायची यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे. ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या सूचना सर्व आमदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच, महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्याचे देखील बावनकुळे यांनी आमदारांना सांगितले. यासह प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
५ डिसेंबर रोजी दुपारी १:०० वाजता मुंबई येथील आझाद मैदानावर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व बडे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.