पुणे : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीवर कोयता उगारण्यात आल्याची घटना शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात घडली. तेथून निघालेल्या एका महिलेने आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरुन आरोपी पसार झाला. याप्रकरणी रात्री उशीरा एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
सुभाषनगर परिसरातून दुपारी तरुणी आणि तिची मैत्रीण निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एकाने तरुणीवर कोयता उगारला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर तरुण दुचाकीवरुन पसार झाला. सुदैवाने या घटनेत तरुणीला दुखापत झाली नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तरुणीने पोलिसांकडे अद्याप तक्रार दिली नाही.
दरम्यान, तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून पसार झालेल्या एकाला रात्री उशीरा तळजाई टेकडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. महेश सिद्धप्पा भंडारी (वय २२, रा. जनता वसाहत) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. भंडारीसह एका साथीदाराविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महाविद्यालयीन तरुणी त्याच्या ओळखीची आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीला धमकावल्याचे उघडकीस आले आहे. सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलीस चौकीजवळ एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती.