मध्यरात्री मोटरसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी मालेगावचे माजी महापौर तसेच एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी एकुण तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अब्दुल मलिक युनूस ईसा गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हल्लेखोरांनी अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर झाडलेल्या तिन्ही गोळ्या त्यांना लागल्या आहेत. एक गोळी हाताला, एक पायाला तर एक छातीत लागली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रात्री १ ते दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जुना आग्रा रोडवरील ताज मॉल कॉम्पलेक्समध्ये अब्दुल मलिक युनूस ईसा हे त्यांच्या काही सहकाऱ्यांबरोबर असतानाच हा हल्ला झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या मलिक यांना शहरातील द्वारकामणी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
त्यानंतर त्यांना उपचारांसाठी नाशिकमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर मालेगावमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.पोलिसांनी तपास सुरु केला आहे.