मुंबई येथील एका डॉक्टरला आईस्क्रीम खाताना त्यामध्ये माणसाचं कापलेले बोट आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला. या घटनेत पुणे कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. हे आईस्क्रिम Yummo ब्रँडचे आहे. आता याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. ते बोट नेमकं कोणाचं होतं? याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
आईस्क्रीममध्ये सापडलेल्या मानवी बोटाची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. ज्या आईस्क्रीमच्या फॅक्टरीत हे आईस्क्रीम तयार करण्यात आलं होतं ती फॅक्टरी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथरिटी ऑफ इंडियानं यापूर्वीच लायसन्स रद्द करुन बंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु केला. तपासात माहिती मिळाली की, ज्या फॅक्टरीत हे आईस्क्रीम तयार झालं होतं त्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचं ते बोट आहे. काही दिवसांपूर्वी फॅक्टरीत काम करत असताना त्याचं बोट छाटलं गेलं होतं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला की आईस्क्रीममध्ये आढळून आलेले बोट हे याच कर्मचाऱ्याचं असाव. मात्र, खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. त्याच अहवाल तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवला आहे.
पुणे कनेक्शन आलं समोर
१३ जून रोजी मुंबईतील यम्मू कंपनीच्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडले होते. आईस्क्रीमच्या रॅपवर लक्ष्मी आईस्क्रीम प्रा. लि., गाझियाबाद, यूपी असा मॅन्युफॅक्चरिंग पत्ता लिहिलेला होता. ही कंपनी गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटी औद्योगिक परिसरात आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत कंपनीचे संचालक यादेश्वर पाल यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही यम्मू सह अनेक कंपन्यांसाठी आईस्क्रिम तयार करतो आणि देशभरात पुरवतो. पण आमच्या कंपनीचा मुंबतील घटनेशी संबंध नाही.
पाल यांनी पुढे सांगितले की, आईस्क्रीम कंपनीचे रॅपर सामान्य झाले आहे. या रॅपर्सवर सर्व उत्पादन प्रकल्पांची नावे एकत्रित लिहिली आहेत. मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला बॅच कोड असतो. यावरुन हे आईस्क्रीम कोणत्या कंपनीत तयार केले हे ओळखता येते. मुंबईत ज्या आईस्क्रिममध्ये मानवी बोट आढळून आले त्याचा बॅच कोड त्याच्या रॅपरवर लिहिलेला आहे. कोडचे आईस्क्रीम पुण्यातील इंदापूर येथील फॉर्च्युन प्लांटमध्ये तयार केले जाते. तर गाझियाबादच्या लक्ष्मी आईस्क्रीम कंपनीचा बॅच कोड डी ने सुरु होतो. फॉर्च्युन आणि लक्ष्मी या दोन्ही थर्ड पार्टी कंपन्या आहेत.
कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
हा प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टर तरुणाने थेट मलाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी यम्मू आईस्क्रिम कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात भा.दं.वि. कलम २७२ (उत्पादनामध्ये भेसळ करणे), कलम २७३ (धोकादायक खाद्य आणि पेय विक्री) आणि कलम ३३६ (दुसऱ्यांचे आयुष्य धोक्यात टाकणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.