पुणे : ‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाचे आणि स्टेशनचे काम गणेशखिंड रस्त्यावर सध्या सुरू आहे. येथील रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया समोर स्टेशनचे काम सुरू आहे. याठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथील मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी या चोरट्यांना हटकले. तेव्हा आरोपींनी एकाला मारहाण करीत स्टीलच्या वस्तू चोरून नेल्या. ही घटना शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कुणाल भारत रणसिंग (वय २२, रा. गाडीतळ, पोलीस चौकीमागे, मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. कुणाल हे ‘पीएमआरडीए’ मेट्रोमध्ये काम करतात. ते ड्युटीवर असताना आरोपी तेथे मोटारसायकलवरुन आले. त्यांनी मेट्रोच्या बॅरिकेटमधून आतमध्ये प्रवेश केला. त्याठिकाणी पडलेल्या स्टीलच्या वस्तू उचलल्या. हा प्रकार लक्षात येताच फिर्यादीने त्यांना हटकले. त्यांच्याकडे ‘इथून काय घेतले?’ अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करीत हाताने तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे