एकाच खोलीत राहणाऱ्या सहकारी मित्राचा गळा आवळून आणि लोखंडी तव्याने मारून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. २८) रात्री दहा वाजताच्या सुमारास महाळुंगे इंगळे येथे घडली.
कालू मंगल रकवार (वय २३, रा.महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. पथरीया, ता. जि. दमुही, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पप्पू मंगल रकवार (वय ४०, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. पथरीया, ता. जि. दमूही, मध्यप्रदेश) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राम सिंग (वय ३०, रा. रेवाना ता. जि. दमुही, मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू, कालू आणि राम सिंग हे तिघे एकाच कंपनीत ठेकेदारीवर काम करतात. तिघेही एकाच खोलीत राहतात. दोन दिवसांपूर्वी राम सिंग याने कालू याचा मोबाईल फोडला. त्यानंतर गुरुवारी रात्री कालू याने राम सिंग याचा मोबाईल फोडला. कालू याचा भाऊ फिर्यादी पप्पू गुरुवारी रात्री भाजी आणण्यासाठी बाहेर गेला होता. भाजी घेऊन पप्पू रात्री दहा वाजता रूमवर आला त्यावेळी कालू हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. रामसिंग हा कालू याच्या छातीवर बसून त्याला लोखंडी तव्याने मारहाण करत होता. तसेच कालू याच्या गळ्याभोवती कपड्याने आवळून मारण्याचा प्रयत्न करत होता. खून केल्यानंतर रामसिंग पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.