पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराचा धडाका जोरदार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील अनेक भागात सभा घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांची पुण्यातील रेसकोर्स या मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी यासाठी जय्यत तयारी सध्या सुरू आहे. तसेच पुणे पोलिसांकडून शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज आणि संशयास्पद ठिकाणांची तपासणी केली जात आहे. येरवडा परिसरात हॉटेलची तपासणी करत असताना पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गोल्ड क्लब चौकातील हॉटेल रिट्झ कार्लटॉन येथे करण्यात आली.
अब्दुल्लाह रुमी (वय-४८ रा. रिलॅक्स पीडी सर्व्हिसेस, सोमनाथ नगर, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महेश बाबुराव लामखडे (वय-३६) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलिसांनी आरोपीवर भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्लाह रुमी हा हॉटेल रिट्झ कर्लटन येथे उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस हॉटेल तपास असताना आरोपी बाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन आरोपीकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी तसेच कोणाची तरी फसवणूक करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारची ओळखपत्र स्वत:जवळ बाळगली होती. त्याच्याकडे विविध पत्त्यांवरील दोन आधारकार्ड, दोन मतदार ओळखपत्रे आढळून आली आहेत. यासोबतच, त्याच्याकडे विविध सिमकार्ड आणि मोबाईल फोन देखील मिळाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे करीत आहेत.