पुणे: सध्या जवळपास सर्व शासकीय ठिकाणी कंत्राटी पध्तीतेने कामगार लावायची प्रथा सुरु झाली आहे. मात्र त्यांच्या वेतन बाबतीत देखील कंत्राटदार हलगर्जीपणा करतानाच चित्र पाहायला मिळतोय; याचाच एक भाग म्हणून येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई व इतर कंत्राटी कामगारांच्या वेतानाबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. कंत्राटी कामगारांच्या दरमहा वेतनातील अर्धे वेतन ठेकेदार घेत असल्याचे समजले आहे. बेकायदेशीरपणे होणाऱ्या या कपातीने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यावर, वडगावशेरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांनी मनोरुग्णालयातील कामगारांची भेट घेतली. यावेळी, अनेक महिन्यांपासून वेतन कपातीचा घडत असलेला नेमका प्रकार त्यांना समजून आला. कामगारांना दरमहा १४,००० रुपये इतके वेतन मिळते, परंतु ठेकेदार केवळ ६ ते ७ हजार रुपये हातावर टेकवतो, असेही कामगार महिलांनी यावेळी सांगितले. पाठारे यांनी संबंधित डॉक्टरांना ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
“पूर्ण वेळ काम करूनही आणि अधिक वेळ काम करूनही ६-७ हजारच रुपये दिले जातात म्हणजे हा एक प्रकारचा अन्यायच आहे. ठेकेदाराने गरिबांचे इतके पैसे खाणे अजिबात योग्य नाहीये. या प्रकाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे. गेली ५ वर्षाहून जास्त काळ ही गरीब, कष्टकरी कामगार मंडळी काम करत आहेत, १४ नाही तर १६ हजार वेतन मिळाले पाहिजे”, असे मत यावेळी बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.
लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून आत्तापर्यंतची सर्व भरपाई करण्याचेही पठारे यांनी संबंधितांना सांगितले आहे. यावेळी उपस्थित कामगार महिलांनी आमदार बापूसाहेब पठारे यांचे आभार मानले.