काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
त्यामध्ये राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे.
या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. आता पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालय ‘सीआरपीसी’च्या कलम २०४ नुसार कार्यवाही सुरू करणार आहे, असे सात्यकी सावरकर यांचे वकील ऍड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले.