वाय दर्जाची सुरक्षा ही कमी आहे, पार्थ मोठा नेता आहे, त्यांना झेड सेक्युरिटी द्यायला हवी होती. अजून ४-५ गाड्या वाढवा. काय झाल आहे, कोयता गँग सामान्य लोकांना त्रास देत आहे. मर्डर सामान्य लोकांचे होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे, सामान्य लोकांना सुरक्षा देण्याची काही गरज नाही. नेत्यांच्या मुलांना सेक्युरिटी दिली पाहिजे, ते काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. सागर बंगल्याचे तेवढेच काम आहे, अशी उपहासात्मक आणि बोचरी टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. राज्यभर हा विषय चर्चेचा झाला आहे. पार्थ यांचे कोणतेही राजकीय, सामाजित कार्य, पद नसताना वाय प्लस सुरक्षा का, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. या प्रकारानंतर सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. रोहित आणि युगेंद्र यांच्या सुरक्षिततेत वाढ करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकारावरून रोहित पवारांनी सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
रोहित पवार यांनी पार्थ यांच्या वाय प्लस सुरक्षेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, नेत्यांना सांभाळणे आणि सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडणे. सागर बंगला खूप चांगले काम करत आहे. माझे असे मत आहे की, पार्थला अजून दोन-तीन सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती, रणगाडा जर कुठे चालत असेल तर रणगाडाही द्यावा.