लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार गुंडांचा शहरात वावर, चौघांना अटक; पिस्तूल, दोन कोयते जप्त
पिंपरी : पिंपरी, चिंचवड आणि वाकड पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक केली. त्यामध्ये पिस्तूल आणि दोन कोयते अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार गुंडांचा शहरात वावर असल्याचे दिसून येत आहे.
आनंद नामदेव दनाने (वय ३१, रा. विद्यानगर, चिंचवड) असे पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आनंद याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. आनंदला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळून आला.
विकास उर्फ विक्या अंकुश भिसे (वय २७, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विकासला दोन नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याला चिंचवड पोलिसांनी दळवीनगर येथून अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे.
वाकड पोलिसांनी माउली उर्फ ज्ञानेश्वर सुबराव पवार (वय २३, रा. पवारनगर, थेरगाव), अजय म्हस्के (रा. थेरगाव) यांना अटक केली आहे. आरोपी थेरगाव येथे पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीचे एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.