लोणावळा शहरातील गाजलेल्या गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील सर्व १४ आरोपींची वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. पल्लोड यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.लोणावळा शहरातून राजेश भारत पिंपळे (वय-२९, रा. कैलास नगर लोणावळा) व अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड (वय-२७ रा. लोणावळा ता. मावळ जि. पुणे) हे दोघे दिनांक १८ जुलै २०१५ पासून बेपत्ता झाले होते. दिनांक २० जुलै २०१५ रोजी मयत इसम अक्षय उर्फ सोन्या श्रीपाल गायकवाडचे वडिल श्रीपाल श्रवण गायकवाड (रा. सिध्दार्थ नगर, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात मनुष्य मिसिंगची तक्रार दिली होती.
मनुष्य मिसिंगच्या तक्रारीचा तपास लोणावळा शहर पोलिस करीत असताना राजेश भारत पिंपळे व अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड या दोघांना लोणावळा शहरातील आरोपी किसन नथू परदेशी (रा. गावठाण, लोणावळा ता. मावळ) याने अंडा भुर्जीच्या गाडीच्या जागेवरून व जागेच्या भाड्यावरून झालेल्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून वरील दोन्ही मुलांना बळजबरीने स्वतःच्या कारमध्ये बसवून कुठेतरी घेऊन जाऊन त्यांचा खून करून, दोघांची प्रेतं मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात खोल दरीत फेकून देऊन, खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. असा खुनाचा गुन्हा श्रीपाल श्रवण गायकवाड यांच्या मनुष्य मिसींग तक्रारीच्या तपासातून निष्पन्न झाल्याने लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दि. ४ ऑगस्ट २०१५ रोजी खुनाचा कट कारस्थान करून पळवून नेऊन खुन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक १८ सप्टेंबर २०१५ रोजी किसन परदेशी व त्याचे साथीदार आरोपी शारदा उर्फ आप किसन परदेशी (वय-४९), यास्मिन लतीफ सैयद (वय-३६), अजय कॄष्णण केसी (वय-२२), अश्विन चंद्रकांत शिंदे (वय-२९), सुनील बाबु पटेकर (वय-४९), विकास उर्फ गोग्या सुरेश गायकवाड (वय-२४), जगदीश उर्फ जग्गू मोरे, सादिक इब्राहिम बंगाली, विनायक उर्फ विनय ढोरे, ब्रिजेश उर्फ बाबा, सलीम शेख या सर्वांना संशयावरून लोणावळा शहर पोलिसांनी राजेश भारत पिंपळे व अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड (दोघे रा. लोणावळा ता. मावळ जि. पुणे) यांच्या खुन प्रकरणी अटक केली होती.
लोणावळा शहर पोलिसांनी सखोल तपास करीत वरिल खुनाच्या गुन्ह्यात एकूण १४ आरोपींच्या विरोधात वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींच्या वतीने पुण्यातील ॲड मिलिंद द. पवार, ॲड. झाहिद कुरेशी, ॲड. अतुल गायकवाड, ॲड. अनिकेत जांभूळकर, ॲड. सुरज देसाई, ॲड.विनायक माने, ॲड. व्ही.आर. राऊत, ॲड.आर.जी.कांबळे यांनी कामकाज पाहिले. काही आरोपी गेली आठ वर्षांपासून येरवडा कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत होते. खटला गंभीर स्वरुपाचा असल्याने खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकीलांची नेमणूक केली होती.
सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात १४ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. आरोपींचा बचाव नकारार्थी होता. दोन मॄतदेहां पैकी एक मॄतदेह संपूर्ण सडलेल्या अवस्थेत होता. एका मॄतदेहाचे फक्त हाड सापडले होते. वरील आरोपींनीच दोन्ही मयत इसमांना कुठेतरी पळवून नेऊन त्यांचा पूर्वीच्या भांडणातून, पूर्ववैमनस्यातून किंवा कुठल्यातरी कारणाने खून केला हे बघणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सरकार पक्षाला न्यायालयात हजर करता आलेले नाहीत.
आरोपींकडून तपासात संशयास्पद काहीही मिळालेले नाही. आरोपी व दोन्ही मयत इसम यांच्या मध्ये पूर्वीची काही भांडणं होती किंवा काही वाद होते हे सरकार पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध केलेले नाही. दोन्ही प्रेतं हे मिसिंग झालेले म्हणजेच राजेश भारत पिंपळे व अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड यांचेच होते हे देखील सरकार पक्षाकडून न्यायालयात सिद्ध होत नाही. कारण एक प्रेतं पूर्ण सडलेले फक्त मानवी सांगाडा असलेले आहे. फक्त प्रेतावरिल निळ्या जिन पॅंट वरून ते प्रेत फिर्यादी गायकवाड यांनी ओळखले होते. दुसऱ्या प्रेताचे फक्त एक हाड मिळाले होते. डिएनए रिपोर्ट देखील त्या प्रेतांचा व मिसींग व्यक्तींच्या नातेवाईकांचा जुळलेला नाही.
त्यामुळे बहुतेक ते दोन्ही बेपत्ता व्यक्ती म्हणजेच राजेश भारत पिंपळे व अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड हे दोघे आजही जिवंत असू शकतात. त्यामुळे वरील दोन्ही बेपत्ता व्यक्तींचा म्हणजेच राजेश भारत पिंपळे व अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड यांचा खरोखरच खुन झाला आहे की नाही हेच सिद्ध होत नाही.
फक्त संशयावरून आरोपींना लोणावळा शहर पोलिसांनी राजेश भारत पिंपळे व अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड यांच्या न झालेल्या खुनाच्या खटल्यात विनाकारण गोवले असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला. युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरत सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.