मावळ : मागील निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पूत्र पार्थ पवार याचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी-शिवसेना फुटली. बारणे शिंदे गटात तर अजित पवार भाजपाच्या वळचणीला गेले. आता ज्यांनी आपल्या मुलाचा पराभव केला त्यांचाच प्रचार करण्याची वेळ अजित पवारांवर आली आहे. मात्र, पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपला भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला घेण्याचा विडा उचलत अजितदादांची राजकीय कोंडी केली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत महायुतीचे श्रीरंग बारणे विरूद्ध महाविकास आघाडीचे संजोर वाघेरे अशी लढत आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार सातत्याने अजित पवार यांना धारेवर धरत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा अजितदादांच्या दुखऱ्या नसीला हात घातला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार याचा श्रीरंग बारणे यांनी दारुण पराभव केला होता. रोहित पवार यांनी हाच मुद्दा उकरुन काढत अजित पवार आणि पार्थ पवार यांना डिवचले आहे.
रोहित पवार यांनी म्हटले की, माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला होता. पण काल पार्थचे वडील अजित पवार स्वतः श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजितदादा करत आहेत.
पार्थचा पराभव पचवून नव्हे तर अजितदादांना स्वतःचे बरेच काही पचवायचे असल्याने ते श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत आहेत. मात्र, पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलो आहे, अशी प्रतिज्ञा रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या या वक्तव्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.