जुन्नर : जुन्नर वनविभागात वाढत्या बिबट्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
बिबटप्रवण क्षेत्रात नागरिकांनी शेतात जाताना एकट्याने न जाता समूहाने जावे. हातात काठी सोबत ठेवावी. अधूनमधून फटाके वाजवून मोठा आवाज करावा. शेतशिवारात असलेल्या घरातील लहान मुलांना, वृद्धांना घराच्याबाहेर एकटे सोडू नये. घराबाहेर उघड्यावर झोपू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.जुन्नर वनविभागातील वनपरिक्षेत्र अंतर्गत बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यामध्ये दोन व्यक्तींना प्राण गमवावे लागले असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
जुन्नर वनविभागाकडून या परिसरात बिबट्या बंदिस्त करण्यासाठी ३० पिंजरे व २० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले असून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे या परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच ५० वन कर्मचारी पायी गस्ती घालून परिसरात जनजागृती करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच जुन्नर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच माणिकडोह रेस्क्यु पथकासह घटनास्थळी पोहचून पुढील कार्यवाही करतात, अशी माहिती जुन्नर वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.