पुणे : निवडणुकीच्या काळात तोंडातून चुकून गेलेला एखादा शब्द निवडणूक फिरवू शकतो. महायुतीच्या उमेदवारांचे मताधिक्य वाढवायचे आहे, घटवायचे नाही. त्यामुळे वादग्रस्त विधाने आणि आक्षेपार्ह कृती टाळा, अशी तंबी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी दिली.
महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या. विधान परिषदेच्या उपसभापती, डाॅ. नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह महायुतीचे आमदार, शहराध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कार्यकर्ता जेव्हा निवडणूक हाती घेतो तेव्हा उमेदवाराचा विजय नक्की असतो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लोकांना मतदानासाठी बाहेर काढणे आवश्यक आहे. महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार राज्यातून निवडून द्यायचे आहेत. प्रचार करताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवा. जो मतदार असतो तो बोलून दाखवितो. त्याचे म्हणणे नीट ऐका. केंद्र आणि राज्य शासनाची कामांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. मोदींना मतदान करण्यासाठी मतदार उत्सुक आहेत. महायुती असल्याने राज्यात भाजपच्या कमळ या चिन्हाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आणि शिवसेनेचे धनुष्यबाण ही चिन्हे आहेत. त्यामुळे घड्याळ आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत हे लोकांना समजावून सांगावे लागेल. त्यादृष्टीने प्रचार करा, अशी सूचनाही त्यांनी केली.
‘रुसवे-फुगवे सामंजस्याने मिटवा’
लोकसभेची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम आहे. राजकीय दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्त्वाची आहे. निवडणूक सोपी आहे, असे गृहीत धरू नका. आपापसातील रुसवे-फुगवे सामंजस्याने मिटवून महायुतीची एकजूट दाखवावी लागणार आहे. निवडणुकीत वादग्रस्त विधाने आणि आक्षेपार्ह कृती करू नका, अशी तंबी अजित पवार यांनी दिली. विरोधकांकडून भ्रम आणि अफवा पसरविल्या जातील. त्याकडे लक्ष द्या. दगाफटका होणार नाही, याची दक्षता घ्या. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविण्यासाठी कामे लोकांपर्यंत पोहोचवा. समाजमाध्यमाबाबत दक्ष राहतानाच विरोधकांना योग्य उत्तर द्या, असे पवार यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस अनुपस्थित
या मेळाव्याला उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस अनुपस्थित होते. यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नाही. फडणवीसही या मेळाव्याला येणार होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विदर्भात आहेत. फडणवीस त्यांच्यासमवेत आहेत. त्यामुळे ते मेळाव्याला येऊ शकले नाहीत.