आरोग्य विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा पुण्यातील अनेक मोठ्या रुग्णालयांनी बंद केली आहे. विमा कंपन्यांच्या जाचक अटी व नियमांमुळे रुग्णालयांनी हे पाऊल उचलले आहे. आता रुग्णालयांनी कॅशलेस सुविधा स्वीकारू नये, असे जाहीर आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी केले आहे.
डॉ. अशोकन रविवारी पुण्यात आले होते. त्यावेळी कॅशलेस आरोग्य विम्याच्या मुद्द्यावर त्यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, की आरोग्य विमा कंपन्यांकडून जाचक नियम आणि अटी रुग्णालयांवर लादल्या जात आहेत. विमा नियामकही रुग्णालयांची बाजू घेण्याऐवजी कंपन्यांची बाजू घेत आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णालयांनी कॅशलेसला नकार द्यावा, अशी आमची भूमिका आहे. कॅशलेस सुविधा स्वीकारल्यास डॉक्टरांकडून स्वतंत्रपणे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांचे अस्तित्व संपेल. याबाबत विमा कंपन्या, विमा नियामक आणि सरकारकडे आम्ही म्हणणे मांडले आहे. विमा कंपन्यांच्या अटी स्वीकारणे रुग्णालयांसाठी अव्यवहार्य आहे. त्यामुळे कॅशलेस सुविधेला सध्या तरी आमचा विरोध आहे.