मावळ: ज्येष्ठ नेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी सहारा वृद्धाश्रमातील निराधारांचा सन्मान करत त्यांच्या समवेत दि. १३ रोजी स्नेह भोजनाचा आनंद लुटला.
अंदर मावळ येथील कुसवली या गावात असलेल्या सहारा वृद्धाश्रमात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष भाई विशाल जाधव, पै. दीपक रोकडे, बाळासाहेब शिंदे, सदा चव्हाण, रिटायर पीएसआय मोहन साळवे, आदी पदाधिकाऱ्यांनी येथील १४ आजी-आजोबांचा शाल, श्रीफळ, सामाजिक व धार्मिक ग्रंथ देऊन सन्मान केला त्यानंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन घेतले. “वंचित व निराधारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार करत असलेले कार्य तसेच या मंडळींच्या जीवनातील अंधार प्रेमाने दूर करण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील, अशी भावना विशाल जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.
भविष्यात सहारा वृद्धाश्रमास वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन पैलवान दीपक रोकडे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन भोगले यांनी केले तर लता चिमटे यांनी आभार मानले.