पिंपरी-चिंचवड : शहरातून दर दोन दिवसाला सरासरी १७ जण बेपत्ता होत आहेत. त्यातील मिळून येणाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने बेपत्ता होणाऱ्या व्यक्ती जातात कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. चालू वर्षात जानेवारी ते मे या कालावधीत १२७७ जण शहरातून बेपत्ता झाले आहेत. यामध्ये विशीतल्या तरुणींची संख्या धक्कादायक आहे. गेल्या पाच महिन्यात २० पेक्षा कमी वय असलेल्या बेपत्ता तरुणींची संख्या १८६ आहे. बेपत्ता झालेल्या नागरिकांना शोधण्यासाठी पोलिसांकडून मिसिंग ड्राइव्ह नावाने मोहीम राबवली जाते. मात्र मागील काही महिन्यांपासून अशी मोहीम देखील राबविण्यात आलेली नाही.
स्मृतिभ्रंश आणि यासारख्या इतर आजारांमुळे नागरिकांचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. ते अचानक बाहेर पडतात आणि बेपत्ता होतात. रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक वृद्ध व्यक्ती दळण आणण्यासाठी घराबाहेर पडली आणि बेपत्ता झाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हिंजवडी परिसरात तिचा शोध लागला आणि तब्बल १६ तासानंतर वृद्ध व्यक्ती घरी परतल्याची घटना शहरात घडली होती. आई-वडिलांच्या भांडणात मुलांचा ताबा मिळविण्यासाठी पालकांकडून एकमेकांच्या परवानगीशिवाय मुलांना नेले जाते. अशा प्रकरणात देखील मुलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली जाते.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन लहान मुले बेपत्ता झाल्याचे प्रकरण घडले होते. पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात त्यांचा शोध लावला. पण त्या मुलांचे बेपत्ता होण्याचे कारण ऐकून पोलिसांनी चक्क डोक्याला हात लावला. देहूगावात राहणारी आठ आणि सहा वर्षाच्या दोन्ही भावांना आळंदी पाहण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी आई वडील घरी नसताना घर सोडले होते.
प्रेमविवाह करण्यासाठी जोडीदारासोबत पळून जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अल्पवयीन मुले देखील अशा कारणासाठी घराचा उंबरा ओलांडतात. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ही मुले असतील तेथून घरचा रस्ता धरतात. विवाहित महिला देखील वेगवेगळ्या कारणांसाठी कुटुंबाला सोडून निघून जातात. यावर्षी जानेवारी महिन्यात २५२, फेब्रुवारी महिन्यात २१७, मार्च महिन्यात २७०, एप्रिल महिन्यात २७२ आणि मे महिन्यात २६६ जण बेपत्ता झाले आहेत.
मिसिंग ड्राइव्ह सातत्याने राबविण्याची गरज मागील दोन वर्षांपूर्वी भोसरी पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी मिसिंग ड्राइव्ह राबवला. यात २०० पैकी १५५ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. अशा मोहिमा आयुक्तालय स्तरावर वारंवार राबविण्याची गरज आहे. यामुळे अनेक व्यक्ती लवकर घरी येण्यास मदत होते.वर्षभरात तब्बल २६८३ जण बेपत्ता मागील वर्षी सन २०२३ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून दोन हजार ६८३ लोक बेपत्ता झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. हीच आकडेवारी सन २०२२ मध्ये दोन हजार ६७१ एवढी होती. त्यात मिळून येणाऱ्या व्यक्तींची संख्या नगण्य आहे.
अल्पवयीन मुलीचे प्रमाण धक्कादायक बेपत्ता होणाऱ्यांमध्ये १८ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलींची संख्या धक्कादायक आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस हद्दीतून जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी महिन्यात १२, मार्च महिन्यात १४, एप्रिल महिन्यात ७, मे महिन्यात ११ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. उमलत्या वयात प्रेमाची झिंग चढते आणि कोवळ्या वयातल्या मुली काहीच दिवसांपूर्वी ओळख झालेल्या त्याच्यासोबत जाण्यास तयार होतात. त्यामुळे पालकांनी देखील याकडे लक्ष देऊन मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. पालकांसोबत झालेले वाद देखील घर सोडून जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट समजावून सांगणे आवशयक आहे.
पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक बेपत्ता होणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. मागील पाच महिन्यात पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयाच्या हद्दीतून ५९२ पुरुष बेपत्ता आहेत. तर ६८४ महिला बेपत्ता झाल्या आहेत. मे महिन्यात एक तृतीयपंथी देखील बेपत्ता झाल्याची नोंद आहे.