शिवजयंती मिरवणुकीत झालेल्या वादातून तीन जणांनी एका तरुणावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२८) रात्री दहाच्या सुमारास एस पी कॉलेजच्या रमाबाई हॉलच्या मागील बाथरूम जवळ घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वैजनाथ रामदास कांबळे (वय-२४) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अनिकेत राजु कांबळे (वय-२५ रा. विद्या हेरिटेज समोर, आझादनगर, वानवडी) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन आदित्य अजित तोरसकर (वय-२० रा. व्यंकटेश क्लासीक, हांडेवाडी, हडपसर) व त्याच्या इतर दोन मित्रांवर भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आरोपी यांचे शिवजयंतीच्या मिरवणुकीत किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्य़ादी व त्याचा मित्र शिवजयंती मिरवणुक संपल्यानंतर एस.पी. कॉलेजच्या रमाबाई हॉलच्या मागे हातपाय धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. मिरवणुकीत झालेल्या वादाच्या कारणावरुन अनिकेत याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या वैजनाथ कांबळे याच्यावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे करीत आहेत.
आदित्य अजित तोरसकर याने दिलेल्या तक्रारीवरुन अनिकेत राजु कांबळे (वय-२५) व वैजनाथ रामदास कांबळे यांच्यावर भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आदित्य तोरसकर व त्याचा मित्र अद्वैत खळदकर हे शिवजयंतीची मिरवणूक संपल्यानंतर एसपी कॉलेजच्या रमाबाईल हॉलच्या मागील बाथरुममध्ये हातपाय धुण्यासाठी गेले होते. मिरवणुकीत झालेल्या वादातून आरोपींनी त्याठिकाणी येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अनिकेत कांबळे याने चाकुसारख्या हत्याराने फिर्यादी यांच्या तोंडावर व अद्वैतच्या हातावर वार करुन जखमी केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.