पिंपरी चिंचवड : पनवेल विधानसभा मतदारसंघातील श्रीरंग बारणे यांचे मताधिक्य सव्वा लाखाच्या वर जाण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून काम करावे. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे मनोमीलन झाले आहे. बारणे यांच्या रूपाने आपल्याला पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत, असे आवाहन पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, खासदार बारणे यांचे काम बोलके आहे. आपले नाणे खणखणीत आहे. त्यामुळे आपली निशाणी धनुष्यबाण घरोघरी पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी अभिमानाने करावे. स्वतःच्या खासदारकीची पर्वा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने तिसऱ्यांदा संसदेत निवडून पाठवूया.
आमदार प्रशांत ठाकुर पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच देशाचा विकास होईल. सब का साथ, सब का विकास, या मोदींच्या घोषणेवर विश्वास ठेवून खासदार बारणे यांनी ठाम भूमिका घेतली. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार याची संपूर्ण जगाला खात्री आहे. मोदींनी केलेली कामे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवा आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य चिंचवडपेक्षा एका मताने तरी जास्त असले पाहिजे.
तर श्रीरंग बारणे म्हणाले, जगात भारताची मान उंचावणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मावळच्या जनतेमुळे मला मिळाली आहे. रायगडच्या जनतेने मला खूप प्रेम दिले. त्यामुळे कोणताही राजकीय दृष्टिकोन न ठेवता मी कामाचा ठसा उमटवू शकलो.
बारणे म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे आम्हाला अडीच वर्षे बाजूला राहावे लागले, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार असणारी शिवसेना पुढे नेण्याचा निर्णय आपण घेतला.
श्रीरंग बारणे म्हणाले, महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय शेवटपर्यंत राहणे आवश्यक आहे, अशी सूचना त्यांनी केली. भ्रष्टाचाराची दुकाने पूर्ण बंद करण्यासाठी, समान नागरी कायदा आणण्यासाठी, पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना ४०० पेक्षा अधिक खासदारांची आवश्यकता आहे. जगात भारताची मान उंचावणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मावळच्या जनतेमुळे मला मिळाली, असे बारणे म्हणाले.