पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आय.सी.यू.) दाखल रुग्णाला उंदराने चावा घेतल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला होता. या रुग्णाचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे सादर केला असून, त्यात रुग्णालय प्रशासनावर कारवाईची शिफारस केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सागर दिलीप रेणुसे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव होते. त्याचा १५ मार्चला रात्री १० वाजता गंभीर अपघात घडला होता. त्यानंतर त्याला १६ मार्चला रात्री उशिरा ससून रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर १५ मार्चला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर २९ मार्चला त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अतिदक्षता विभागात १ एप्रिलला सकाळी रुग्णाला उंदीर चावल्याची तक्रार नातेवाइकांनी केली होती. त्याच रात्री रुग्णाचा मृत्यू झाला.
सागर रेणुसे याचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात २ एप्रिलला करण्यात आले. त्यात मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. चौकशी समितीने शवविच्छेदन अहवालासह इतर बाबींची चौकशी केली. हा अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सादर केला आहे. चौकशी समितीने अहवालात रुग्णाच्या शरीरावर उंदीर चावल्याच्या खुणा असल्याचे म्हटले आहे. ससूनच्या प्रशासनावर याप्रकरणी कारवाई करण्याची शिफारसही समितीने केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ससून रुग्णालयात रुग्णाला उंदीर चावल्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी पूर्ण करून अहवाल माझ्याकडे सादर केला आहे. या अहवालावर लवकरच कार्यवाही केली जाईल. – डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग