सध्याच्या युगात संगणक, इंटरनेट, मोबाईल, समाजमाध्यम जसे फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. याचा गैर फायदा घेऊन सायबर गुन्हेगार लोकांची आर्थिक फसवणूक करत आहे. यापार्श्वभूमीवर ऑनलाइन फसवणुकीच्या विविध प्रकारांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आर्थिक व सायबर पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे.
ट्रेडिंग फ्रॉड, टास्क फ्रॉड, फेडेक्स फ्रॉड, मॅन ईन मिडल फ्रॉड, फेसबूक फ्रेन्ड रिक्वेस्ट फ्रॉड, मेट्रोमोनी फ्रॉड, सेक्सटॉर्शन, लोन अॅप द्वारे ऑनलाईन फसवणूक तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL), गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) या केंद्रीय एजन्सीच्या नावाचा गैरवापर करुन होणाऱ्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकी संदर्भात पुणे शहर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत इंटरनेटचा सर्रास वापर सुरु आहे. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन खरेदी-विक्री, ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणे इत्यादी प्रकारे ऑनलाईन सर्व्हिस पुरवणाऱ्यांकडून प्रिपेड सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, अशा चांगल्या सुविधांचा सायबर गुन्हेगारांकडून गैरवापर केला जात आहे. नागरिकांना भीती दाखवून, प्रलोभने देऊन, जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसेच समाज माध्यमांचा वापर करुन फोटो मॉर्फ करुन महिलांना अश्लील फोटो पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे गैरप्रकार देखील केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी शांत डोक्याने, सुरक्षितरित्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर केला तर होणारा मनस्ताव व फसवणूक टाळता येवू शकते.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL), गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) या केंद्रीय एजन्सीच्या नावांचा गैरवापर करुन सायबर गुन्हेगारांकडून पैसे उकळण्यासाठी केला जात आहे. अशा घटना देशभरात घडत आहेत. विविध केंद्रीय एजन्सीच्या उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगार खोट्या सह्यांचे बनावट पत्र तयार करतात. हे पत्र बनावट ई-मेल द्वारे नागरिकांना पाठवले जाते. या ई-मेलद्वारे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईची भिती दाखवून ऑनलाईन पैसे भरण्यासाठी भाग पाडून आर्थिक फसवणूक केली जात आहे.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
सध्या बरेच ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. त्यापैकी ट्रेडिंग फ्रॉड, टास्क फ्रॉड, फेडेक्स फ्रॉड, मॅन ईन मिडल फ्रॉड, फेसबूक फ्रेन्ड रिक्वेस्ट फ्रॉड, मेट्रोमोनी फ्रॉड, सेक्सटॉर्शन, लोन अॅप द्वारे जास्त प्रमाणात फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच केवायसी अपडेट, एम.एस.इ.बी. इलेक्ट्रीक बिल भरले नसल्याचे सांगून लिंक पाठवून संबंधितांचे बँक अकाउंट खाली केले जाते. याशिवाय गुगल वरुन विविध ऑनलाइन सुविधांचा जसे फ्लाईट, हॉटेल, ट्रेन बुकिंग, कुरीअर कॅन्सलेशन इत्यादी करत असताना फसवणूक होऊ शकते. ओएलएक्स या ऑनलाईन वेबसाईटवर कोणतीही वस्तू विकताना किंवा विकत घेताना संपूर्ण खात्री करुन किंवा समक्ष भेटूनच व्यवहार करावा. तसेच सतर्कता बाळगावी, असे सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
‘या’ ठिकाणी तक्रार करा
समाजामध्ये बदनामी झाल्यास काय याची भिती न बाळगता स्वत: सोबत घडलेल्या फ्रॉडबाबत तसेच कारवाईच्या भितीस बळी न पडता अशा फसवणुकीच्या घटनांबाबत जवळील पोलीस स्टेशन, सायबर पोलीस स्टेशन पुणे येथे संपर्क करावा. तसेच crimecyber.pune@nic.in किंवा ०२०-२९७७१००९७, ७०५८७१९३७१ या क्रमांकावर संपर्क करावा अथवा १९३० या नंबरवर कॉल करुन फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती देऊन तक्रार नोंदवावी. किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे यांनी नागरिकांना केले आहे.