पुणे : पुण्यात घरफोड्यांचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आले आहे. शहरातील सिंहगड रोड भागातील आनंदनगर परिसरातील बंगल्यात घरफोडी करुन ४४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. हा प्रकार शनिवारी (दि.२७) रात्री सव्वासात ते रविवार (दि.२८) दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे.
याबाबत चंद्रकांत मधुसुधन आठल्ये (वय-६८ रा. मथुरा बंगला, सफळानंद सोसायटी, संतोष हॉल जवळ आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत आठल्ये हे त्यांच्या बंगल्याला कुलुप लावून बाहेर गेले होते.
चोरट्याने फिर्यादी यांच्या बंगल्याच्या मागील बाजुस असलेल्या बेडरुमचे खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश केला. चोरट्यांनी बंगल्याच्या बेडरुमधील कपाटातील ड्रॉवरचे कुलूप तोडून दागिने चोरले. तसेच फिर्यादी यांचा मुलगा समीर यांच्या बेडरुममधील कपाटाच्या ड्रॉवरचे कुलूप तोडून ७८२ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. फिर्यादी रविवारी दुपारी घरी आले असता त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक गुन्हे राघवेंद्रसिंह क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.