दुकानात काम करणाऱ्या कामगाराने हातचलाखीने साडे नऊ लाखांचे सोने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवार पेठ लोणार आळीतील सुमय्या गोल्ड स्मीथ नावाच्या दुकानात २९ मार्च रोजी सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी कामगारावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत साबीर सुकुर मल्लिक (वय-३६ रा. नानापेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन रिजाबुल शहा उर्फ सफिक शेख (वय-२८ रा. वर्धमान, पश्चिम बंगाल) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्य़ादी यांचा सोन्याचा व्यवसाय आहे. तर आरोपी त्यांच्या दुकानात कामाला आहे. आरोपीने दुकानातील २२ कॅरेटचे ९ लाख ५९ हजार ९३६ रुपयांचे १५७.१४० मिलीग्रॅम सोने चोरुन पळून गेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी रविवारी (दि.३१ मार्च) पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
चोरट्यांकडून सोन्याचे दागिने लंपास
हडपसर : हडपसर परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नयन विजय कुऱ्हाडे (वय-२० रा. भगीरथ नगर, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातील एक लाख ८२ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले.
हा प्रकार शनिवारी (दि.३०) सकाळी पावणे अकरात ते पावणे बारा या दरम्यान घडला.
दुसरी घटना कात्रज-शेवाळवाडी पीएमटी बसमध्ये घडली आहे. याबाबत अंजना गणपत जाधव (वय-५० रा. हडपसर) यांनी फिर्य़ाद दिली आहे. फिर्य़ादी कात्रज-शेवाळवाडी पीएमटी बसमधून प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने पर्समधील ४० हजार ५६० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. हा प्रकार रविवारी (दि.३१) दुपारी तीन ते साडे चार दरम्यान घडली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.